उस्मानाबाद- ११ केव्हीची मुख्य प्रवाह असलेली वीजेची तार तुटून झालेल्या अपघातात परंडा तालुक्यातील देवगाव खुर्द येथील नवनाथ गोरख शिंदे यांचे दोन बैल विजेचा शॉक लागून जागीच ठार झाले. तर नवनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना आज (गुरुवार) सकाळी देवगाव येथे घडली. पोळ्याच्या आदल्या दिवशी दोन्ही बैलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बैल पोळ्याच्या आदल्या दिवशीच विजेचा झटका लागून दोन बैलांचा मृत्यू, शेतकरी गंभीर जखमी - उस्मानाबाद
मुख्य विद्युत प्रवाह असलेली तार तुटून झालेल्या अपघातात विजेचा झटका लागून दोन बैल जागीच ठार झाले. तर शेतकरी नवनाथ गोरख शिंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
शिंदे हे नेहमीप्रमाणे बैलगाडी जूपून शेताकडे जात होते. सिराळा विद्युत उपकेंद्राची ११ केव्हीची मुख्य प्रवाह असलेली वीजेची तार तुटून रस्त्यावर पडली होती, या तारेचा बैलांना स्पर्श होताच दोन्ही बैल जागीच ठार झाले. तर लोखंडी बैलगाडी असल्याने गाडीत विजप्रवाह उतरला त्यामुळे गाडीतील नवनाथ शिंदे यांना विजेचा जबर धक्का बसला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिराळा विद्युत उप केंद्रावर जास्त भार झाल्याने तार तुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.