उस्मानाबाद -मुघलांपेक्षाही वाईट आणि ब्रिटिशांपेक्षा काळे असे हे राज्यातील ठाकरे सरकार आहे, अशी टीका भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली. ते येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी आध्यात्मिक आघाडीकडून गुरुवारपासून आंदोलन करण्यात येत होते. मात्र, आता हे आंदोलन थांबले असल्याचे तुषार भोसले यांनी सांगितले.
भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले पत्रकार परिषदेत बोलताना. दरम्यान, सर्व साधुसंतांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, त्यांना अटक होईल, असे सांगितले जात आहे. आमचे आंदोलन दपण्यासाठी पोलिसांचा वापर करण्यात येत आहे. हे सरकार मुघलांपेक्षा वाईट आणि ब्रिटिशांपेक्षा काळे असल्याची टीका भोसले यांनी केली. तसेच आमचे आंदोलन थांबवण्यासाठी कलम 144 लावण्यात येईल, असेही सांगितले आहे. या कलमामुळे येथील स्थानिक व्यापारी आणि भाविकांना त्रास होइल म्हणून आम्ही हे आंदोलन मागे घेतले आहे. त्याचबरोबर आमचे आंदोलन दडपल्यामुळे आम्ही काळ्या फिती लावून निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.
नियम आणि अटी घालून 1 दिवसाची दिली होती परवानगी -
आंदोलनाला सुरुवातीला कुठलीही परवानगी देण्यात आलेली नव्हती. मात्र, तरीही हे आंदोलक आंदोलनावर ठाम होते. यानंतर फक्त 50 माणसांच्या उपस्थित आणि कोरोना संदर्भातील नियम पळून एक दिवसाची परवानगी देण्यात आली. यानंतर आज (शुक्रवारी) सकाळी आठ वाजता नवचंडी यज्ञ करून या आंदोलनाला पुन्हा सुरुवात होणार होती. मात्र, पोलिसांनी रात्रीच आंदोलकांनी उभा केलेला तंबू काढून टाकला.
हेही वाचा -'भाविकांच्या श्रद्धेची स्थाने, मंदिरे महाराष्ट्रात सुरू होऊ शकत नाहीत हे लाजिरवाणे'
दरम्यान, राज्यातील मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे उघडण्यावरून भाजपा आणि राज्य सरकारमध्ये जुंपली आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत उघडली नाहीत, तर नाईलाजाने टाळे तोडावी लागतील, असा इशारा भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिला होता. तर यानंतर मंदिरे तोडण्यासाठी ही मोगलाई आहे का, असा प्रश्न मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. मंदिरांचे टाळे तोडायला या, आम्ही तुम्हाला बघूच असा सज्जड इशाराही त्यांनी दिला होता.
तर केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये 30 नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्याप्रमाणेच राज्य सरकारनेही 30 नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी लॉकडाऊनची 14 ऑक्टोबरची स्थिती 30 नोव्हेंबरपर्यंत कायम राहील, अशी अधिसूचना जारी केली आहे. या कालावधीत चित्रपटगृहे, मंदिरे, शाळा, महाविद्यालये सध्या तरी बंदच राहणार आहेत. दुसरीकडे राज्यातील सर्व मंदिरे खुली करून भजन, कीर्तनाला व काकडारतीला परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळाने केली आहे.