उस्मानाबाद - शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळेवाडी या गावातील लोक सध्या भीषण समस्येला तोंड देत आहेत. शुद्ध पाण्याअभावी ग्रामस्थांवर आज काळेकुट्ट आणि गढूळ पाणी वापरण्याची वेळ आली आहे. परिणामी २० टक्के ग्रामस्थांना त्वचेचे आजार जडले आहेत.
पाणी पिण्याचे की नाल्याचे? मुळेवाडी ग्रामस्थांवर दुषीत पाणी पिण्याची वेळ
दुषीत आणि गढूळ पाण्याचे सेवन केल्यामुळे गावातील २० टक्के लोकांना त्वचेचे आजार जडले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी खासदार आणि माजी पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या तेर गावापासून मुळेवाडी थोड्या अंतरावर आहे. १ हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील लोक वेगळ्याच कारणाने त्रस्त आहेत. या गावात पाण्याची कमतरता नाही. मात्र, विहिरींचे अधिग्रहण केले नसल्यामुळे तेरणा धरणातून येणारे अशुद्ध पाणी ग्रामस्थांना वापरावे लागत आहे. तसेच नळाद्वारे येणारे अशुद्ध पाण्याचे शुद्धीकरणही केले जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
कपडे, भांडी आणि आंघोळीसोबतच नाईलाजाने ग्रामस्थांना या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे. परिणामी अशा दुषीत आणि गढूळ पाण्याचे सेवन केल्यामुळे गावातील २० टक्के लोकांना त्वचेचे आजार जडले आहे. दुषीत पाण्याच्या सेवनामुळे ग्रामस्थांच्या अंगाला खाज येत असून शरीरावर गान्धी (चट्टे) उठत आहेत. मात्र, प्रशासन या समस्येकडे दुर्लेक्ष करत असल्याचे गावकरी सांगतात. त्यामुळे यांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.