उस्मानाबाद - कोरोनामुळे गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेले महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे मंदिर आज पाडव्याच्या मुहूर्तावर खुले करण्यात आले. दरम्यान, मंदिरात कोरोनाबाबत योग्य खबरदारी घेतली जात आहे. पहाटे 5 वाजल्यापासून या मंदिर परिसरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे.
तुळजाभवानी मंदिर, उस्मानाबाद भाविकांना मास्कशिवाय प्रवेश नाही -
भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून महाराष्ट्रासह, परराज्यातील भाविकदेखील दर्शनासाठी तुळजापूर नगरीत दाखल झाले आहेत. मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याने भाविकांनी आनंदी असल्याचे सांगितले. आज पहाटे चरणतीर्थ झाल्यानंतर दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली. तसेच प्रवेशद्वारावर भाविकांना मास्कशिवाय आत प्रवेश दिला जात नाही. आज दिवाळी पाडवा असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह कर्नाटक मधूनही भाविक दर्शनासाठी तुळजापूरला आले आहेत.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लहान मुलांना आणि वृद्धांना प्रवेशबंदी -
कोरोना संक्रमण टाळण्यासाठी तुळजाभवानी मंदिरात वारंवार साफसफाई, स्वच्छता व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 65 वर्षावरील नागरिक, 10 वर्षापर्यंतचे मुलं, गर्भवती महिला आणि आजारी नागरिकांना मंदिर प्रवेशास व दर्शनासाठी बंदी करण्यात आली आहे. दर्शन रांगेत सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच भाविकांना तुळजाभवानीचे दर्शन घेता येणार आहे.
हेही वाचा-गणपतीपुळे मंदिर श्रींच्या दर्शनासाठी खुले
हेही वाचा-मुंबईतील प्रसिध्द सिद्धिविनायक मंदिर खुले; भाविकांची गर्दी