उस्मानाबाद- महिला व बालविकास विभागाला जिल्ह्यातील बाल विवाह रोखण्यात यश आले आहे 14 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत बालसुरक्षा पंधरवडा राबविण्यात आला होता. या 15 दिवसांत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी होत असलेले तीन बालविवाह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रोखले आहेत.
जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे. बाल विवाह संबंधीची योग्य ती माहिती प्रशासनापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. सातत्याने कार्यवाही करूनही छुप्या पद्धतीने बालविवाह लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त आढळले आहे. मात्र, नुकत्याच राबविलेल्या मोहिमेत शहरी, निम्नशहरी आणि ग्रामीण भागात बालविवाहाचा प्रयत्न होत असल्याचे समोर आहे. बालसुरक्षा पंधरवड्यात बालविकास विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एकात्मिक बाल विकास अधिकारी अनिल कांबळे व जिल्हा बालसंरक्षण अधिकारी ए.बी. कोवे यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने जिल्ह्यात 3 बालविवाह रोखण्यात यश आले.