उस्मानाबाद - गाढविणीच्या दुधाला सध्या चांगलाच भाव आला आहे. आरोग्यासाठी गुणकारी मानल्या जाणाऱ्या दूधांपैकी गाढवाचे दूध देखील एक आहे. गाढविणीचे दूध हे चक्क दहा हजार रुपये लिटरने विकले जात आहे. तेही भोंगा लावून. दहा हजार रुपये भाव, चकित झालात ना? हो हे खरं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात दहा मिली दूध घेण्यासाठी शंभर रुपये मोजावे लागत आहेत. उमरगा शहरातील गावठाण परिसरात पाल ठोकून नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील धोत्रे कुटुंबीय राहतात. त्यांच्याकडे २० गाढविनी आहेत आणि हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे.
गाढविणीचे दूध मानले जाते गुणकारी -
गाढविणीचे दूध हे लहान मुले, दमा व न्यूमोनियाासाठी गुणकारी मानले जाते. धोत्रे कुटुंबीय गाढविणीचे दूध सध्या उमरगा शहरात भोंगा लावून विकत आहेत. विशेष म्हणजे घरासमोरच दूध काढून या दुधाची विक्री केली जाते. विशेष म्हणजे या दुधाची किंमत एका लिटरमागे दहा हजार एवढी आहे. दहा मिली दुधासाठी शंभर रुपये मोजावे लागतात. गाढविणीच्या दुधापासून मिळालेल्या पैश्यातून हे वीस लोकांचे कुटुंब आपला उदरनिर्वाह करत आहे.
दुधामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते -
गाढविणीच्या दुधामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते, या दुधामुळे सर्दी, खोकला, कफ व न्यूमोनिया हे आजार होत नाहीत. शक्यतो लहान मुलांना असे आजार होऊ नयेत व झाल्यास ते बरे होण्यासाठी गाढविणीचे दूध गुणकारी आहे. कोरोनाकाळात या दुधाला मोठी मागणी असल्याचे दूध विक्रेत्या लक्ष्मीबाई धोत्रे या सांगतात.