उस्मानाबाद - कोरोना व्हायरसचे भयंकर परिणाम मानवांसह देव-देवतांच्या संस्थानांनाही बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्योगधंद्याबरोबरच मंदिर देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर संस्थानच्या आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर बंद करण्यात आल्यापासून आजपर्यंत १ कोटी २६ लाख २० हजार ८९४ रुपयांच्या उत्पन्नात घट झाली आहे.
CoronaVirus : तुळजाभवानी मंदिर संस्थानलाही कोरोना संकटाचा फटका.. उत्पन्नात कोट्यवधींची घट - कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरसचे भयंकर परिणाम मानवांसह देव-देवतांच्या संस्थानांनाही बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्योगधंद्याबरोबरच मंदिर देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर संस्थानच्या आर्थिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

मागील वर्षी १६ मार्च २०१९ ते १६ एप्रिल २०२०या कालावधीत मंदिराला १३१९८९५५ रुपयांचे उत्पन्न झाले होते. यंदा मात्र कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने १७ मार्च २०२० पासून १६ एप्रिल २०२० या कालावधीत मंदिराला केवळ ५ लाख ७८ हजार ६१ रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १२६२०८९४ रुपयांची तूट झाल्याचे दिसत आहे. श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर १७ मार्चपासून भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. असे असले तरी मंदिरातील दैनंदिन विधी सुरळीत पार पाडले जात आहेत. एक महिन्याच्या कालावधीत यात्रा उत्सवामुळे भाविक लाखोच्या संख्येने तुळजापुरात दर्शनार्थ येतात. त्यामुळे मंदिराच्या आर्थिक उत्पन्नासह दानपेटी, देणगी व अन्य मार्गातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र मंदिर बंद असल्याने व भाविक दर्शनासाठी येत नसल्याने मंदिराच्या आर्थिक उत्पन्नात मोठी घट झाली आहे.