उस्मानाबाद - जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली आहे. लातूर मधील शाहू कॉलेजला प्रवेश मिळेल की नाही या नैराश्यातून अक्षय शहाजी देवकर या 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. अक्षयला दहावीत 94.20 टक्के गुण मिळाले मात्र कॉलेज प्रवेशाच्या चिंतेतून त्याने आत्महत्या केल्याने देवळाली या गावावर शोककळा पसरली आहे.
अक्षयच्या वडील शहाजी देवकर यांना एकूण पाच एकर कोरडवाहू जमीन आहे. याच जमिनीत उत्पन्न घेऊन शहाजी देवकर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यामुळे अक्षयला त्याच्या घरच्या परिस्थितीची जाणीव झाली होती. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही अक्षय दहावीच्या परीक्षेत चांगले गुण घेऊन यश मिळवल्याने या गावात अक्षयचे बॅनरही लावण्यात आले. मात्र अक्षयला शाहू कॉलेजमध्ये प्रवेश होत हवा होता आणि शाहू कॉलेजच्या पहिल्या लिस्टमध्ये अक्षयचे नाव नसल्याने अक्षयने हे टोकाचे पाऊल उचलले.
अक्षयला गणितामध्ये 99 टक्के गुण मिळाले. अक्षय हा लहानपणापासून हुशार होता. प्रत्येक श्रेणीमध्ये उत्तीर्ण होत होता. त्यामुळे शहाजी देवकर यांनी प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आठवीच्या नंतर अक्षयला लातूरच्या सानेगुरुजी माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी पाठवले होते. मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर शिष्यवृत्ती मिळणार नाही. त्यामुळे त्याने गुरुवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची डॉक्टर होण्याची इच्छा होती 94 टक्के गुण मिळवूनही शाहू कॉलेज लातूर येथे नंबर लागतो की नाही आणि प्रवेश मिळाला नाही तर मॅनेजमेंट कोट्यातून पैसे भरायची वेळ येईल आणि आई-वडिलांची परिस्थिती नाही याची चिंता सतावत होती. त्यामुळेच त्याने स्वतःचे जीवन संपवले.
याप्रकरणी छत्रपती संभाजी महाराज यांनीही ट्विट करत अक्षयने केलेल्या आत्महत्येबद्दल व मराठा समाजाला आरक्षणासंबंधी होत असलेल्या विलंबाबद्दल खेद व्यक्त केला आहे.