उस्मानाबाद- कळंब तालुक्यातील पिंपळगावामध्ये 2017 मध्ये नरबळीचे प्रकरण समोर आले होते. यात सहा वर्षाच्या कृष्णा इंगोले या लहान मुलाचा नरबळी देण्यात आला होता. याप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उस्मानाबादचे सत्र न्यायाधीश एम.जी. देशपांडे यानी ही शिक्षा सुनावली. याप्रकरणी चिमुकल्याच्या जवळच्याच नातेवाईकांनी बळी दिला होता. यात त्याची सख्खी आत्या, चुलत आत्या, चुलती, आजोबा यांनी पुणे येथील मांत्रिकाच्या सांगण्यावरुन हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. सचिन सुर्यवंशी यानी न्यायालयासमोर बाजू मांडली.
पिंपळगावात राहणारा कृष्णा इंगोला हा सहा वर्षाचा चिमुकला 26 जानेवारी 2017 शाळेतून प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपवून वस्तीवरील घरी परत आला होता. घरी आई नसल्याने तो बाहेर खेळत होता. त्यानंतर तो अचानक गायब झाला. दिवसभर शोधूनही त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे कृष्णाची आई सारीका इंगोले यांनी मुलाला पळवुन नेल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतामध्ये कृष्णाचा मृतदेह सापडला होता. याचा तपास कळंब पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक डी. डी. बनसोडे यानी केला.
असा केला कृष्णाचा खून
कृष्णाच्या मृतदेहाजवळ सापडेल्या साहित्यावरून हे प्रकरण नरबळीचे असल्याचा अंदाज बांधला जात होता. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला. तपासात कृष्णाची आत्या द्रोपदी पौळ हिने अंगणात खेळत कृष्णाला बोलावून घेतल्याचे समोर आले. त्यानंतर तिने कृष्णाला त्याचा चुलता आरोपी उत्तम इंगोले यांच्या घराच्या मागील सामाईक विहिरीवरजवळच्या दाट झाडीत नेले. त्याच ठिकाणी आरोपी द्रोपदी हिने इतर आरोपीच्या मदतीने कृष्णाचा खून करुन नरबळी दिल्याचे उघड झाले.