उस्मानाबाद - तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात देवीला १०८ साड्या गुंडाळून नगरहुन आलेल्या मानाच्या पालखीत बसवून देवीची मिरवणूक काढण्यात आली. तसेच पालखीतून मिरवणूक पार पडल्यानंतर देवी पलंगावर विश्रांती (श्रमनिद्रा) घेत असते.
गेली नऊ दिवस तुळजाभवानी मंदिरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. नवरात्रीत देवीचे नऊ अलंकार व नऊ उपवास केल्यानंतर आज मुख्य उत्सव दसरा साजरा केला जातो. देवीने महिषासुराबरोबर नऊ दिवस युद्ध खेळून त्यावर विजय मिळवला तोच विजय उत्सव म्हणजे दसरा अशी आख्यायिका सांगितली जाते. तुळजाभवानी देवीची मूर्ती चलमूर्ती असून देवीला आज तिच्या सिंहसनावरून बाहेर आणले जाते. त्यानंतर पौर्णिमेपर्यंत देवी निद्रावस्थेत असते.