उस्मानाबाद - जिल्ह्यातील वाशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत स्थानिक आमदार राहुल मोटेंच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांनी पाठ फिरवली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डॉ. पदमसिंह पाटील व त्यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील हे अनुपस्थित राहिले. त्यामुळे राणा-पाटील यांचा भाजप पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे. यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी डॉ. पाटील पिता-पुत्रांचा अप्रत्यक्ष समाचार घेत सडकून टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातबारा उताऱ्यावर ज्यांचं नाव लिहिलेले आहे. ज्यांनी आत्तापर्यंत अख्ख आयुष्य आमच्या पक्षात घालवलं, ज्यांना कायमस्वरूपी लाल दिवा देण्याचं काम शरद पवारांनी केलं. ते जर पक्ष बदलण्याचा विचार करीत असतील तर त्यांचा पराभव शरद पवारांचे मावळे करतील, असा समाचार घेत, जे १५ वर्ष मंत्रिमंडळात होते, ते पक्ष अडचणीत आल्यावर पक्ष सोडायला लागलेत, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
याचबरोबर फितुरी करून पक्ष सोडणाऱ्यांवर टीका करत असताना, हे सर्व सूर्याजी पिसाळ असून जनताच यांना धडा शिकवेल, असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला. सोबतच शिवसेनेवर टीका करताना, शिवसेना आता पूर्वीची शिवसेना राहिली नाही. शिवसेनेत निष्ठावंतांना डावलले जात असून बाळासाहेबांच्या विचाराने काम करणाऱ्या नेत्यांची वाताहत झाली आहे. मात्र, जे आता नव्याने शिवसेनेत आले, ते शिवसेनेला थैल्या देऊन मंत्रिपदासाठी संधी मिळवत असल्याची टीका जयंत पाटलांनी शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्यावर केली .
राष्ट्रवादी फोडल्याशिवाय सत्ता येत नाही. फक्त 5 वर्षात भाजप जगातला सर्वात श्रीमंत पक्ष झाला असून शिवसेना फक्त फुसक्या सोडण्याचे काम करते अशी कडाडून टीका जयंत पाटलांनी शिवस्वराज्य यात्रेदरम्यान वाशी येथे केली.
अमोल कोल्हेंची मुख्यमंत्र्यांवर टीका -
मुख्यमंत्री निवडणूक जवळ येताच मराठवाडा दुष्काळमुक्ती करण्याची आणि वॉटर ग्रीड करण्याचे स्वप्न दाखवतात. मात्र, मागील ५ वर्ष त्यांचे हात बांधलेले होते का? असा सवाल करीत जलयुक्त शिवार योजनेच्या घोटाळ्यातील पैसे कुठे गेले? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केली. यासोबतच सयाजी शिंदेंनी केलेल्या वृक्षलागवडी बाबतीतील खुलाशानंतर त्यांना दबाव आणून माफी मागायला लावली, अशी टीका देखील त्यांनी केली.