उस्मानाबाद - राज्यावर कधी नव्हे इतके आता आर्थिक संकट आहे. राज्याला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी सरकार कर्ज घेण्याच्या तयारीत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्याची गरज असल्याची भावना खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी मी स्वत: मुख्यमंत्र्यांना आग्रह करणार असल्याचंही सांगितले. ते उस्मानाबादेत पत्रकार परिषदेत बोलत होते. पवार सध्या पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आहेत.
राज्यावर मोठं आर्थिक संकट; मोठ्या प्रमाणावर कर्ज घेण्याची गरज - sharad pawar on flood situation
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार नुकसानग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. आज शरद पवार यांनी उस्मानाबादेत पत्रकार परिषद घेऊन नुकसानीची परिस्थिती मांडली.
शरद पवार पुढे म्हणाले, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या संपूर्ण जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. तर सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने सोयाबीन पीक उद्धवस्त झाले आहे. त्याचप्रमाणे ऊस पिकावर देखील परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे गावातील रस्ते खराब झाले आहे. त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. राज्य आर्थिक संकटात आहे. राज्यात कधी नव्हे इतकं आर्थिक संकट आता आहे. राज्याला मोठ्या प्रमाणात कर्जाची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांना भेटून कर्ज काढण्याची विनंती करणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
पीक विमा योजनेच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची गरज असल्याचे विधान त्यांनी केले. केंद्र सरकार पीक विम्याच्या बाबतीत धोरणे आखतात. पीक विम्याची भरपाई देण्याची प्रक्रिया कठिण आहे. शेतकऱ्यांना ती प्रक्रिया करण्यात अनेक अडथळे येतात. मात्र सध्या राज्यात संकट आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देखील मदत करण्याची मागणी पवार यांनी केली.