उस्मानाबाद -कडकनाथ कोंबडी घोटाळ्याने माझ्या वडिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. ते नेहमी आत्महत्येची भाषा करतात. मुख्यमंत्री साहेब, माझ्या वडिलांना या संकटातून बाहेर काढा, असे भावनिक पत्र उस्मानाबाद जिल्ह्याच्या देवळाली गावातील एका शाळकरी मुलीने लिहिले आहे. धनश्री बिक्कड असे या मुलीचे नाव असून ती जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकते.
मुख्यमंत्री साहेब माझ्या पप्पाला या संकटातून बाहेर काढा
धनश्रीने हृदयस्पर्शी शब्दांत आपल्या वडिलांच्या व्यथा या पत्रात मांडल्या आहेत. तिचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काळी कोंबडी, सोन्याचे अंडी देणारी कोंबडी अशी कडकनाथ कोंबडीची ओळख आहे. मांस आणि अंडी महाग असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कडकनाथ कोंबडी संगोपनाचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या निमित्ताने कळंब तालुक्यातील देवळाली येथील आश्रुबा बिक्कड यांची एका कंपनीने चार लाख रुपयांची फसवणूक केली. यामुळे त्यांचा संसार आणि आयुष्य संकटात आले आहे.
हेही वाचा - विम्याची 'ती' रक्कम जीवनानंतर नव्हे जीवनातच; राज्य ग्राहक मंचाने एलआयसीला असा दिला दणका
बिक्कड यांनी इस्लामपूर आणि मुंबई येथे आंदोलन केले. लोक प्रतिनिधींकडे दाद मागितली मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. आश्रुबा यांची फसवणूक झाल्याने ते नेहमी तणावाखाली असतात, घरात चिडचिड तणावाचे वातावरण असल्याने त्यांची मुलगी धनश्री हिला आपल्या वडिलांची चिंता सतावत होती. २६ जानेवारीनिमित्त शाळेत शुभेच्छा पत्रांची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात धनश्रीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वडिलांची समस्या सांगितली.
धनश्रीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र -
श्री मुख्यमंत्री साहेब आपणास सा. नमस्कार,
"सर्वात पहिले तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव धनश्री आश्रुबा बिक्कड आहे. मी तीसरी वर्गात जि. प. प्राथमिक शाळा देवळाली, ता.कळंब येथे शिकत आहे. साहेब माझे पप्पा शेतकरी आहेत, पण आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीच्या वेळेला पाऊसच नसतो. मग शेतात काहीच धान उगवत नाही. माझे पप्पा नेहमी टेंशनमध्ये असतात. सारखे चिडचिड करतात. मम्मीवर रागवतात. माझ्यावर पण चिडतात. त्यांच्या तोंडून एकच शब्द निघतो त्या कडकनाथ घोटाळ्याने वाटोळं केलं. कडकनाथ कोंबड्यांच्या घोटाळ्यात लय पैसं आडकल. मेलेलं बरं, मरणाशिवाय आता दुसरा पर्यायच नाही, असचं सारखं बोलतात. साहेब मला लय घाबरायला होते. आमच्या शाळेत वाचण्यासाठी पेपर येतो, त्यात पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या येतात. साहेब आमच्या पप्पाला तुम्ही समजुन सांगा. त्यांना त्या कडकनाथ कोंबड्यासाठी दिलेले पैसे परत मिळवून द्या, प्लिज माझ्या पप्पांना मदत करा. आमच्या सरांनी सांगितलं की, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना 26 जानेवारी निमित्त शुभेच्छा पाठवा. म्हणून मी हे पत्र तुम्हाला लिहले. चुक भुल माफ करा."
तुमची विश्वासू,
धनश्री आश्रुबा बिक्कड
इ.3 री, जि.प.प्रा.शाळा देवळाली, ता.कळंब, जि.उस्मानाबाद.