उस्मानाबाद - गेल्या काही दिवसांपासून चीन देशात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसचा परिमाण पोल्ट्री फार्म व्यावसिक व चिकन विक्रेत्यांवर झाल्याचे पाहायला मिळते आहे जिल्ह्यात चिकनच्या माध्यमातून कोरोनाची लागण होत असल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरल्याने चिकनची विक्री घटली असून, त्यामुळे पोल्ट्री चालकांमध्ये धास्ती पसरली आहे. नागरिकांत निर्माण झालेला गैरसमज दूर करावा, सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे चीन येथे आलेल्या व्हायरसचे परिणाम सरळ सरळ भारतीय अर्थव्यवस्थेवर झाल्याचे दिसत आहे.
कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे उस्मानाबादेतील चिकन विक्रेत्यांवर संक्रांत
उस्मानाबादमध्ये चिकन विक्रेत्यांवर कोरोना व्हायरसच्या अफवांचा परिणाम झाला आहे. यामुळे चिकन विक्री घटली असून पोल्ट्री चालकांमध्ये धास्ती पसरली आहे.
या बाबत उस्मानाबाद जिल्हा पोल्ट्री असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासन आणि सायबर पोलिस विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरोना व चिकन, अंडी यांचा संबंध नसताना चिकन विषयी चुकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जिल्ह्यामध्ये कुक्कुटपालन हा व्यवसाय मुख्य असून अनेक चिकन विक्रेते, व्यापारी, शेतकरी, औषध विक्रेत्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, कोरोनाच्या अफवांमुळे चिकनची विक्री घटल्याने व्यवसायावर बंधने येत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. कोरोनाचा आणि चिकनचा काहीही संबंध नसताना गैरसमज पसरविण्यात आल्याने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.