उस्मानाबाद - व्यापाऱ्याची चारचाकी आडवून दरोडेखोरांनी सात लाख लंपास केले होते. या प्रकरणी पोलिसांनी 24 तासांत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकून काही मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे कळंब तालुक्यातील येरमाळाजवळील नाथवाडी पाटीजवळ घडली होती.
महामार्गावरील दरोड्यातील आरोपी 24 तासांत जेरबंद - osmanabad police
व्यापाऱ्याची चारचाकी आडवून दरोडेखोरांनी सात लाख लंपास केले होते. या प्रकरणी पोलिसांनी 24 तासांत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकून काही मुद्देमाल हस्तगत केला आहे.
व्यापारी राष्ट्रीय महामार्गावरून 29 डिसेंबर रोजी औरंगाबाद येथून लग्नसोहळा आटोपून पंढरपूरकडे निघाले होते. यावेळी 12:30 ते 1 वाजताच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग 52 वरून येरमाळा ते उस्मानाबाद जाणाऱ्या कारसमोर दरोडेखोरांनी वाहनाचा जॅक टाकल्याने सदरील व्यापाऱ्यांची कार त्यास धडकून थांबली. कार थांबताच अंधारात लपलेल्या 6 बुरखाधारी दरोडेखोरांनी त्या कारमधील प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या जवळील चाकूचा धाक दाखवत एकूण 190 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3 मनगटी घड्याळे, 4 मोबाइल आणि रोख रक्कम 61 हजार रुपये असा एकूण साडेसात लाखांचा मुद्देमाल लंपास केला. यातील आरोपींनी दोन दुचाकी त्याच ठिकाणी टाकून अंधारात फरार झाले.
चोरी झाल्यानंतर या व्यक्तींनी येडशी टोल नाका गाठून तेथे गस्तीवर असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस यंत्रणेने तातडीने तपास सुरू केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवून तीन दरोडेखोरांना जेरबंद केले. अवघ्या 24 तासांच्या आत आरोपींचा छडा लावून कळंब तालुक्यातील मोहा येथून महेश शिवाजी पवार उर्फ चेल्या रा. बोरखेड,ता.बीड, बबन शहाजी काळे उर्फ लल्ल्या आणि प्रकाश शहाजी काळे रा.मोहा यांना ताब्यात घेऊन दरोड्यात लुटलेल्या ऐवजापैकी 4 मोबाइल जप्त केले आहेत. तर गुन्ह्यातील त्यांचे अन्य साथीदार व लुटीतील उर्वरित मुद्देमालाबाबत येरमाळा पोलीस तपास करत आहेत.