उस्मानाबाद - जिल्ह्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला असून चाऱ्याच्या एका पेंडीचा दर २५ ते ३० रुपये झाला आहे. त्यामुळे येत्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अजूनच बिकट होण्याची चिन्हे आहेत. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटला होता. परंतु, चाऱ्याचा दर वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
उस्मानाबादमध्ये जनावरांच्या चाऱ्याचे दर गगनाला भिडले हेही वाचा -'महा'शपथविधी संपन्न.. उद्धव ठाकरे मुख्यमंंत्री, नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा
परतीच्या पावसामुळे रब्बीची पेरणी व्यवस्थित होऊ शकली नाही. अजूनही काही भागातील शेतांमधील वापसा झाला नसल्याने पेरणी खोळंबली आहे. तर जिराईत भागात भरपूर पाणी नसल्यामुळे पेरणी होऊ शकली नाही. त्यामुळे भविष्यातील चाराटंचाई वाढणार आहे. गेली वर्षभर जिल्ह्यामध्ये चारा छावण्या सुरू होत्या. परतीचा पाऊस झाल्याने जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न काही प्रमाणात मिटला होता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी सुरू असलेल्या १०० हून अधिक चारा छावण्या बंद करण्यात आल्या. मात्र, आता लवकरच शासनाला चारा छावण्या सुरू कराव्या लागतील, असे चित्र जिल्ह्यात आहे.
आज घडीलाही जिल्ह्यामध्ये २५ ते ३० रुपयाला पिवळ्या ज्वारीच्या कडब्याची एक पेंडी मिळत आहे. या दिवसांमध्ये सर्वत्र हिरवा चारा असतो. मात्र, जनावरांच्या चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. नोव्हेंबर महिन्यातच चाऱ्याचे दर वाढल्याने पुढील दोन तीन महिन्यात हेच दर ५० ते ६० रुपये प्रती पेंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्ताच जमेल तसा चारा साठवून ठेवावा लागणार आहे.