उस्मानाबाद- विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश नेते मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हे सगळे भाजप पक्षात प्रवेश करण्याच्या बाल हट्टापायी झाले असल्याचे बोलले जात आहे. या हट्टामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत झाली आहे. असाच बालहट्ट उस्मानाबाद जिल्ह्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आता राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे.
याबाबत माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी राणा जगजितसिंह पाटील हे जिल्ह्याचे माजी खासदार व पाटबंधारेमंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आहेत. तर अजित पवार यांचे ते भाचे आहेत. त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजप पक्ष प्रवेश हा शरद पवारांसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या प्रवेशाबाबत भाजपकडून किंवा खुद्द राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून खुलासा करण्यात आलेला नसला, तरीही या पक्ष प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. कारण राष्ट्रवादीकडून सुरू करण्यात आलेल्या 'शिवस्वराज्य' यात्रेला राणा जगजितसिंह पाटील यांनी गैरहजेरी लावली होती. त्याचबरोबर या यात्रेदरम्यान घेण्यात आलेल्या सभेमध्ये राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या राणा जगजितसिंह पाटील यांचा खरपूस समाचार घेतला होता.
डॉ. पद्मसिंह पाटील यांची भूमिकाही अद्याप समजलेली नाही
त्याचबरोबर डॉ. पद्मसिंह पाटील यांची भूमिकाही अद्याप समजलेली नाही. पाटील हे शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी मानले जातात. गेली ४० वर्ष जिथे शरद पवार तिथे डॉ.पद्मसिंह पाटील असे समीकरण राहिले आहे. त्यामुळे पद्मसिंह पाटील यांची भूमिका समोर येणे गरजेचे आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की, आम्ही सुरुवातीला प्रमुख नेत्यांच्या मुलांना पक्षप्रवेश देतो, आणि त्यानंतर प्रमुख नेत्यांना. त्यामुळे पद्मसिंह पाटील हेदेखील भाजपत पक्ष प्रवेश करतील, असा अंदाज आहे.
पद्मसिंह पाटील यांना जिल्ह्यात मानणारा वर्ग दांडगा आहे. सक्रिय राजकारणातून पद्मसिंह पाटील अलिप्त असले, तरी प्रत्येक निवडणुकीत प्रचारासाठी पद्मसिंह पाटील यांची भूमिका मोलाची ठरते. आजही ते प्रत्येक निवडणुकीत प्रचारासाठी रिंगणात उतरतात.
बाल हट्टापायी भाजपामध्ये प्रवेश करणारे महाराष्ट्रातील पिता-पूत्र
सुजय विखे यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर काही दिवसातच राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला. त्याचबरोबर वैभव पिचड यांनी भाजप पक्ष प्रवेश केल्यानंतर मधुकर पिचड हेदेखील भाजपमध्ये दाखल झाले. यातच आणखी एक राजकारणातील मोठे कुटुंब म्हणजे रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजपा पक्ष प्रवेशानंतर लागलीच विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही भाजपा प्रवेश केला. अशा पद्धतीने सुरुवातीला मुलांना भाजपा प्रवेश देऊन त्यानंतर मुलांच्या वडिलांनाही भाजपात प्रवेश दिले जाते. त्यामुळे आता पद्मसिंह पाटील यांची भूमिका काय असेल असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे.