उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील कोहळा उत्पादक शेतकरी राहुल पाटील यांच्या शेतातील कोहळा काढणीला आला आहे. मात्र, महामारीमुळे संचारबंदी लागू करण्यात आली; आणि शेतकऱ्यांचा माल वावरातच पडून राहिला. शेतकरी बाजारपेठांमध्ये माल पोहोचवू शकले नाहीत. लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद झाल्याने व्यापाराला आणखी खीळ बसली. त्यामुळे 30 टन कोहळ्याचा ढिगारा शेतातच गोळा करून ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे त्यांना लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
कोहळा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट, 30 टन कोहळ्याचा ढिगारा शेतातच - lockdown in osmanabad
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथील कोहळा उत्पादक शेतकरी राहुल पाटील यांच्या शेताती कोहळा काढणीला आला आहे. मात्र, महामारीमुळे संचारबंदी लागू करण्यात आली; आणि शेतकऱ्यांचा माल वावरातच पडून राहिला.
पारंपरिक पिकांपेक्षा आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी धडपड करणारे राहुल पाटील यांनी दीड एकर जमिनीत कोहळ्याचे पीक घेतले. याचा वापर हॉटेल व्यवसायिक सांबार बनवण्यासाठी करतात. मुंबई पुण्यासह अनेक शहरांतील हॉटेल व्यवसांयिकांमध्ये याची मागणी असते.
कोहळ्याच्या पिकासाठी त्यांनी आवश्यक ड्रीपची सोय केली. यावर एक लाख रुपये खर्च करून आधुनिक पद्धतीने लागवड केली. पिकासाठी एकूण दीड लाख रुपये खर्च केला. पोटच्या मुलाप्रमाणे हे पीक सांभाळले. मात्र, कोरोनाचा प्रसार वाढल्याने सर्वत्र संचारबंदी लागू झाली. बाजारपेठ बंद असल्याने शेवटी शेतातच कोहळ्याचा ढिगारा रचण्यात आलाय. अजून दहा टन कोहळा झाडावरच असल्याचे राहूल यांनी सांगितले. असा एकूण 40 टन कोहळा वाया गेल्याने या शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे.