उस्मानाबाद -कोरोनाच्या पार्श्वभूमीवरइतिहासात पहिल्यांदाच देशभरासह राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. तब्बल आठ महिने राज्यातील सर्व प्रमुख धार्मिकस्थळे बंद होती. मात्र, आज (सोमवारी) पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे सुरू करण्यात आली आहेत. येथील तुळजाभानीच्या दर्शनासाठी येणारे भाविक पूजाअर्चा करतात. यात अभिषेक, जागरण-गोंधळ, सिंहासन, परडी भरवणे, जोगवा मागणे तसेच इतर 16 प्रकारच्या पूजा केल्या जातात. मात्र, कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता गर्दी टाळण्यासाठी या सर्व पुजेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. भाविकांना फक्त तुळजभवानीचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे पुजाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले पुजारी?
आपला देश पारतंत्र्यात असतानाही अशा महामारी आल्या होत्या. मात्र, त्यावेळीही मंदिरे आणि पुजाविधी सुरू होत्या. स्थानिक इंग्रज अधिकाऱ्यांनीही धार्मिक भावना लक्षात घेऊन सर्व विधी करण्यास परवानगी दिली होती, असा इतिहासाचा दाखला या पुजाऱ्यांनी दिला. तसेच हे प्रशासन फक्त नियमावर बोट ठेऊन कारभार हाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.