उस्मानाबाद - शहरातील आनंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण आणि त्यांच्या चालकाने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. ही मारहाण पोलीस निरीक्षक चव्हाण यांना चांगलीच महागात पडली आहे. या प्रकरणी चव्हाण ज्या पोलीस ठाण्यात निरीक्षक म्हणून कार्यरत होते त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर या मारहाणीची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक राजतीलक रौशन यांनी सतीश चव्हाण यांची सोलापूरच्या ट्रेनिंग सेंटरला (प्रशिक्षण केंद्र) बदली केली आहे.
पान टपरीवर पोलिसांचा राडा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उस्मानाबाद शहरातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका पान टपरीवर शनिवारी (दि. 21 ऑगस्ट) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फरीद शेख (वय 26 वर्षे, रा. समर्थनगर) हा तरुण उभारला होता. यावेळी आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण आणि त्यांचा चालक पठाण आले आणि त्यांनी टपरी चालकास पान-सुपारीची मागणी केली. यावेळी अन्य दोन ग्राहक उभारले होते. पान टपरी चालकास पान देण्यास उशीर झाल्याने पोलीस निरीक्षक चव्हाण यांचा चालक मुक्रम पठाण याने 'तुला साहेब दिसत नाहीत का? तुला पोलिसांचा इंगा दाखविला पाहिजे, असे म्हणून शिवीगाळ सुरू केली.
यावेळी टपरी चालकाचा मित्र फरीद शेख याने पठाण यास शिवीगाळ करू नका म्हणून मध्यस्थी केली असता, तू मध्ये पडू नको म्हणून पठाण याने त्यासही शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्याने पोलीस गाडीत बस म्हणून जबरदस्तीने गाडीत बसविले आणि आनंदनगर पोलीस ठाण्यात नेले. त्याठिकाणी पोलीस निरीक्ष चव्हाण व चालक मुक्रम पठाण व अन्य दोघांनी फरीद शेख यास रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली, अशी तक्रार देण्यात आली होती.
तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून याची दखल घेत पोलीस अधीक्षक राजतीलक रौशन यांनी सतीश चव्हाण यांची सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली.
हेही वाचा -उस्मानाबाद जिल्ह्यात भाजप-शिवसेनेत ट्विट वॉर; भाजप आमदारांना कौरवांची तर शिवसेना खासदारांना रंगा-बिल्लाची उपमा