उस्मानाबाद - तालुक्यातील एका खेडेगावात दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीची प्रकृती खालावली असून, सदरील मुलीच्या पालकांनी तिला प्रथम उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.
हेही वाचा -नाशिक: कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर; भाव नियंत्रणात ठेवण्याची गृहिणींची मागणी
त्यावेळी तिच्या आई - वडिलांनी उलट्या, जुलाब होत असल्याचे सांगितले. परंतु, डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यात तिने चौघांनी अत्याचार केल्याचे सांगितले. याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर पीडितेला पुढील उपचार व तपासणीसाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चारही आरोपी १६ ते १७ वयोगटातील असल्याचे सांगितले जात आहे.
सदरची घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून, याबाबत अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या मुलीला लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांना सदरील घटना कळल्यानंतर त्यांनी लातूर येथील सरकारी रुग्णालयात जाऊन कुटुंबाची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे अद्यापही सदरील आरोपींवर कुठलाही गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याचा आरोप आमदार अभिमन्यू पवार यांनी केला आहे.