उस्मानाबाद - जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी संचारबंदीचा आणि जिल्हाबंदीचा नियम फाट्यावर मारत शासकीय गाडीचा वापर करून पत्नीला भेटण्यासाठी पुणे गाठले असल्याचे समोर आले आहे. यामुळे पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून यांनी प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या पुणे येथे दौरा केल्याने खळबळ उडाली आहे.
संचारबंदी नियमांची एैशी की तैशी.. पत्नीला भेटण्यासाठी जिल्हा परिषद अधिकाऱ्याने रातोरात गाठले पुणे - कोरोना व्हायरस
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी संचारबंदीचा आणि जिल्हाबंदीचा नियम फाट्यावर मारत पत्नीला भेटण्यासाठी पुणेवारी केल्यामुळे प्रशासनात खळबळ माजली आहे. पवार यांनी शासकीय गाडीचा गैरवापर करताना प्रशासनाची कोणतीही पूर्णपरवानगी घेतली नव्हती.

अजिंक्य पवार हे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असून त्यांनी रातोरात केलेल्या पुणेवारीमुळे सामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. पवार यांनी लॉकडाऊन काळात जिल्हाबंदी व संचारबंदी असतानाही शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हा नोंद करावा, अशी मागणी होत आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी या प्रकरणी पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांना शासकीय निवासस्थानात क्वारंटाईन करण्यात आले असल्याचे सांगितले.