उस्मानाबाद - भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील आज तुळजापूर येथे आले होते. यावेळी त्यांच्या उपस्थितीत तुळजापूर येथील अनेक नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी गोकुळ शिंदे यांनी आपल्या राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदाचा राजीनामा देखील चंद्रकांत पाटलांकडे सुपूर्त केलाव आहे.
राष्ट्रवादीचे राजीनामे भाजपच्या खिशात...तुळजापूर राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा आगळावेगळा पक्षप्रवेश - तुळजापूर विधानसभा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव गोकुळ शिंदे यांनी आज तुळजापूर येथे चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थीतीत भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या लेटरहेडवर लिहिलेला आपला राजीनामा चंद्रकांत पाटलांकडे सुपूर्त केल्याने, आता राष्ट्रवादीचे राजीनामे भाजपच्या खिशात असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
गेले 35 वर्षापासून राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून काम करत असलेले गोकुळ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने दिला आहे. पक्ष प्रवेश करताना घड्याळ्याचे चिन्ह असलेल्या लेटरहेडवर लिहिलेला आपला राजीनामा त्यांनी चंद्रकांत पाटलांकडे दिला. यावेळी राजीनाम्यात त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर जोरदार टीका केली. राजीनाम्यात एकीकडे पक्षावर टीका करत असताना त्याच राजीनाम्यात त्यांनी भाजपची प्रशंसा केली आहे. भाजप हा विकासाची कामे करणारा पक्ष असून या कामावर विश्वास ठेवूनच आपण भाजप प्रवेश करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. शिंदे यांचा हा भाजप प्रवेशाचा मेळावा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार अनिल काळे यांच्यासाठी भरवला गेल्याचे बोलले जात आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात यापूर्वी भाजपाकडून सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनी विधानसभा लढवली होती. मात्र यावेळी भाजपाचे अनिल काळे यांना संधी दिली जाईल असे बोलले जात आहे.