उस्मानाबादः -शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत ( MLA Tanaji Sawant ) यांना एकीकडे विरोध होत असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील ( Osmanabad district ) भूम येथे त्यांच्या समर्थनार्थ हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. कार्यकर्ते सावंत यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत मोठे शक्तिप्रदर्शन करण्यास सुरवात केले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम शहरात मोठी रॅली काढून घोषणा दिल्या. सावंत यांना मंत्रिपद मिळाले नाही. तसेच स्थानिक राष्ट्रवादी त्रास देत असल्याची व्यथा शिवसैनिक व समर्थकांनी मांडल्या. सावंत जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला आहे. तुम्ही बांधाल ते तोरण, तुम्ही सांगाल ते धोरण, आम्ही सदैव तुमच्या सोबतचा हुंकार देत हे कार्यकर्ते एकवटले व रस्त्यावर उतरले आहेत.
आमदार तानाजी सावंत यांनी घेतलेला निर्णय योग्य असून, जिल्ह्यात निष्ठावंत शिवसैनिक आणि पदाधिकारी यांचे स्वकीयबरोबरच विरोधक असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने कसे खच्चीकरण केले याचा पाढा सभेत मांडला आहे. तानाजी सावंत यांनी भूम, परंडा, वाशी बरोबरच उस्मानाबाद आणि यवतमाळ मतदार संघात ( Yavatmal constituency ) कोट्यावधी रुपये खर्च करुन, शिवजल क्रांतीच्या माध्यमातून जलसिंचन व जलसंधारण याची कामे केली. सामूहिक विवाह सोहळा, आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाचे पालक्तव स्वीकारून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक, शैक्षणिक मदत करत आधार दिला. अनेक मुलांना शिक्षण व नौकरीची संधी दिली. यासह अनेक विकासकामे स्वखर्चाने सामाजिक मदत करण्याच्या भूमिकेतून केली हे सांगितले.