उस्मानाबाद -पोलीस रेझिंग डे निमित्त उस्मानाबाद पोलीस मुख्यालय तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर पोलीस विभागाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शुक्रवारी रेझींग डे आणि सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिला व बालकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्हयातील शाळा, कॉलेजमधील शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, विविध सामाजिक संस्थां आणि नागरिकांचा मोठया प्रमाणावर सहभाग होता.
उस्मानाबाद पोलीस दलातर्फे रेझिंग डे, महिलांची सायबर सुरक्षा कार्यशाळा संपन्न हेही वाचा -अचालबेट येथून निघाली मराठी साहित्याची ज्योत, आज पोहोचणार उस्मानाबादला
या रॅलीची सुरूवात पोलीस स्टेशन उस्मानाबाद शहर येथून करण्यात आली. पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅली सुरू करण्यात आली. या रॅलीचा समारोप पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे करण्यात आला. पोलीस मुख्यालय येथे रेझिंग डे निमित्त पथनाटय, महिला व मुलींकरिता आत्मसंरक्षणपर प्रात्यक्षिके, देखावे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच बरोबर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी महिला आणि बालकांना त्यांच्यावर होणाऱ्या सायबर गुन्हे व अत्याचाराबाबत जागृती तसेच त्यांना असलेले कायद्याचे संरक्षण या विषयांबाबत प्रबोधन केले.
हेही वाचा -साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात, आज अचलबेटवरून निघणार साहित्याची ज्योत
याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना पोलीस विभागाकडे असणारा दारूगोळा, विविध हत्यारे याबाबत माहिती देण्यात आली. तसेच जिल्हयातील हरविलेल्या व्यक्तींबाबतच्या माहितीचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते.