उस्मानाबाद - शहरात चक्क एका गाईचे डोहाळे जेवण करण्यात आले आहे. 'भड' कुटुंबीयांनी एखाद्या महिलेचे करावे तसे आपल्या लाडक्या गंगा नावाच्या गाईचे डोहाळे जेवण अगदी विधिवत केले. गंगेचा हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अगदी उत्साहात आणि आनंदात पार पडला.
उस्मानाबादमध्ये गंगा नावाच्या गायीचे डोहाळे जेवण करण्यात आले उस्मानाबादमधील 'भड' कुटुंबाने आपल्या लाडक्या "गंगा" साठी या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कुटुंबीयांकडे तीन वर्षांची गंगा नावाची एक गाय आहे. ही गंगा पहिल्यांदाच माता होणार असल्याने आपल्या गाईचे डोहाळे जेवण करायचे, असे या कुटुंबीयांनी ठरवले.
हेही वाचा... उस्मानाबादेत पाच दिवसापासून पावसाची रिपरिप सुरुच; शेतकऱ्यांना दिलासा
लाडक्या गंगाला कार्यक्रमापूर्वी स्वच्छ अंघोळ घालण्यात आली. झुल, हार फुले, फुगे यांनी तिला सजवण्यात आले. डोहाळजेवणाच्या निमित्ताने दारात खास मंडप आणि रांगोळीही काढण्यात आली होती. एखाद्या महिलेसाठी जे जे करतात ते सर्व या गाईसाठी करण्यात आले. सुहासिनी महिलांना बोलावून गंगाची ओटीही भरण्यात आली. गंगाच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गंगाच्या समोर बसून गाण्याचा छोटासा कार्यक्रमही घेण्यात आला.
हेही वाचा... उस्मानाबाद : चारा छावण्यांच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
भारतात प्राण्यांवर विशेष प्रेम असल्याचे नेहमीच पहायला मिळते. त्यातही गायीला माता मानून तिला अधिकच जपले जाते. आता भड कुटुंबीयांच्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमानंतर इतर गायींचेही डोहाळे पुरवले जातील यात शंका नाही...