उस्मानाबाद -वीजबिल माफीसह महिला बचत गटाचे कर्ज माफ करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
वीजबिल माफीसाठी मनसेचे आंदोलन; परवानगी नाकारली तरीही काढला मोर्चा - उस्मानाबाद मनसे आंदोलन न्यूज
अतिरिक्त वीज बिलांच्या प्रश्नावरून मनसेने आक्रमक धोरण स्विकारले आहे. वीज बिले कमी करण्याच्या मागणीसाठी राज्यभर मोर्चे आणि आंदोलने केली जात आहेत. उस्मानाबादमध्येही मोर्चा काढण्यात आला होता.
कोरोनाच्या संकटात वीजवितरण कंपनीने नागरिकांना जास्तीचे वीजबिल देत शॉक दिला. वाढीव बिल रद्द करा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यावर वीजबिल कमी करू असे संकेत राज्यातील मंत्र्यांनी दिले होते. मात्र नंतर त्याच मंत्र्यांनी वीजबिल भरावे लागेल असे सांगितले. त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेत वीजवितरण विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली. मनसेचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चात सहभागी पदाधिकारी व नागरिकांनी वीजबिल माफीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोलिसांनी या मोर्चाला अडवून मोर्चा थांबवण्याची विनंती पदाधिकाऱ्यांना केली होती. या मोर्चाला परवानगीही नाही. त्यामुळे निवेदन देण्यासाठी फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावे असे सुचवले. पोलिसांच्या विनंतीला मान देत मनसे कार्यकर्त्यांनी चौकातच ठिय्या दिला.
दिलीप धोत्रे यांनी मोर्चाला आलेल्या कार्यकत्यांना व महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, आबासाहेब ढवळे, राजेंद्र गपाट, अमरराजे कदम, दादा कांबळे, अविनाश साळुंके, सागर बारकुल, अतुल जाधव, पाशाभाई शेख यांच्यासह कार्यकर्ते व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.