धाराशिव :मानवी तस्करीप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेतले आहे. ढोकी पोलीसांनी तस्करी केलेल्या 11 मजुरांची सुटका काही दिवसापूर्वी केली होती. या प्रकरणात महत्त्वाची बाब समोर आली आहे. या मजुरांची विक्री भुम येथील दलालाने केली होती. वाशिम, औरंगाबाद, हिंगोली, जालना, मध्य प्रदेश, नांदेड आणि बुलढाणा येथील मजुरांची तस्करी झाली होती. अवघ्या 2 ते 4 हजार रुपये प्रति मजूर दलाली घेऊन या मजुरांना विकले गेले होते.
पोलिसांना मिळाली गृप्त माहिती : मानवी तस्करी प्रकरणी ढोकी पोलिसांना गृप्त माहिती मिळाली होती. हिंगोली येथील संदीप रामकिसन घुकसे याला वाखरवाडी येथे बळजबरीने पकडून ठेवून त्याच्याकडून दिवसभर विहीरीचे काम करुन घेतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या एका पथकाने वाखरवाडी येथे जाऊन घुकसे यांच्या शोध घेतला. त्यावेळी पोलिसांना भगवान अशोक घुकसे ही व्यक्ती भेटली. त्याच्यासोबत आणखीन पाच व्यक्ती पोलिसांना आढळून आले. पोलिसांना यांना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यानंतर धक्कादायक बाब समोर आली.
मजुराने सांगितली आपबीती : गुत्तेदार कृष्णा बाळु शिंदे, संतोष शिवाजी जाधवसह इतर दोघेजण मजुरांकडून दिवसा बळजबरीने विहिरी खोदण्याचे काम करुन घेत. दिवसभर विहिरीमध्येच या मजुरांना ठेवले जात असायचे. मजुरांना संडास देखील तेथेच करायला लावली जात. संध्याकाळ झाल्यानंतर मजुरांना विहिरी बाहेर काढले जात. बाहेर आणल्यानंतर ते मजूर पळून जाऊ नये, म्हणून त्यांच्या हाता-पायाला साखळी बांधली जात असायची. त्यानंतर त्या मजुरांना ट्रॅक्टरला बांधून ठेवले जात असायचे. बंदिस्त करण्यात आलेल्या मजुरांपैकी एक मजुराने तेथून पळ काढत गाव गाठले. गावात येऊन त्याने तेथील प्रकार सांगितला. मग उर्वरित मजुरांच्या सुटकेसाठी सुत्रे हालली. उस्मानाबाद तालुक्यातील वाखरवाडी येथील 6, तर कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील 5 अशा 11 मजुरांचा छळ गुत्तेदार कृष्णा बाळु शिंदे, संतोष शिवाजी जाधवसह इतर दोघे करायाचे. रात्री साखदंडाने या मजुरांना बांधून ठेवले जात असायचे आणि तसेच या मजुरांना दारू पाजली जात असायची. या दारुमध्ये गुंगीचे औषध टाकले जात असायचे. मजुरांनी विरोध केला तर त्यांना पाईपने मारहाण केली जात असायची.