उस्मानाबाद - कोरोना काळात विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक निमयांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र काही नागरिकांकडून हे नियम डावलले जातात. शाळा, रुग्णालये, बँका अशा सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना या नियमांचे सर्सारपणे उल्लंघन होताना दिसून येते. मात्र अशा ठिकाणी नियमांचे पालन करण्यासाठी सक्ती करणारा एक वैशिष्ठपूर्ण रोबो उस्मानाबाद शहरातील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. या रोबोला विद्यार्थ्यांनी 'मिस मास्की' असे नाव दिले आहे. हे रोबो कोणी मास्क घातला की नाही, व्यक्तीचे तापमान किती आहे, यावर लक्ष ठेवून त्याला नियम पालनाच्या सूचना करतो, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी असा रोबोची मदतच होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर तेरणा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मास्की रोबो संदर्भातील ईटीव्ही भारतचा हा विषेश वृत्तांत...
मास्की रोबो असे करतो काम
विद्यार्थ्यांनी या रोबोला मास्की असे नाव दिले आहे. रोबोच्या समोर उभारल्यास त्याच्यात वापरलेल्या लाईव्ह कॅमेरामध्ये इमेज कॅप्चर करतो. जर एखाद्या व्यक्तीने मास्क घातला नसेल तर तो त्वरित त्या व्यक्तीला मास्क घालण्याच्या सूचना देतो. जर मास्क घातला असेल तर तो वेलकम म्हणतो. तसेच व्यक्तीच्या तापमानाची नोंदही हा रोबो करतोय. आलेल्या व्यक्तींचे स्वागत करून हा रोबो सॅनिटायझर देतो. अत्यंत अल्प किमतीत बनवलेला हा रोबोट भविष्यात नक्कीच सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालये या ठिकाणी नियमांचे पालन करायला लावण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
पेटंट मिळवण्यासाठी करणार प्रयत्न : प्राचार्य
तेरणा महाविद्यालयातील एकूण 30 विद्यार्थ्यांनी रोबो बनवण्यासाठी परिश्रम घेतले. रोबो बनवण्यासाठी एकूण 2 महिन्याचा कालावधी या विद्यार्थ्यांना लागला. ज्याच्यासाठी 30 ते 35 हजार रुपये इतका खर्च आला. पुढे चालून मोठ्या संख्येत जर रोबो बनवले तर या पेक्षा 50 टक्के खर्चात रोबो बनेल, असे महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रमसिंह माने यांनी सांगितले. तसेच आपण याचे पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे देखील प्राचार्य माने यांनी सांगितले आहे.