उस्मानाबाद- जिल्ह्यात 18 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत एकाच दिवशी 18 रुग्ण आढळल्याची ही पहिलीच वेळ आहे. परांडा तालुक्यातील आसू या गावातील 38 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे उस्मानाबादमधील कोरोनाबाधितांची संख्या त्रिशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
उस्मानाबादमध्ये 18 कोरोनाबाधित वाढले; रुग्णसंख्या 286 वर
उस्मानाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 286 वर पोहोचली आहे. यापैकी 191 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 81 जणांवर उपचार सुरु आहेत. अनलॉक सुरु झाल्यापासून जिल्ह्यात 213 कोरोना रुग्ण वाढले आहेत.
शनिवारी घेतलेल्या स्वॅब नमुन्यातील काही अहवाल व रविवारी घेतलेल्या नमुन्यातील स्वॅब हे प्रलंबित होते. ते काल दोन टप्प्यात प्राप्त झाले त्यानुसार जिल्ह्यात एकूण 18 रुग्णांची भर पडली असून एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 286 रुग्णांची नोंद झाली असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 191 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर अजुन 81 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
लॉकडाऊन नंतर अनलॉक केल्यामुळे रस्त्यावर नागरिक सर्रासपणे फिरताना दिसत आहेत. यात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच एक जून नंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. जवळपास 213 रुग्णांची नोंद 1 जून नंतर झालीय. अनलॉक झाल्यापासून 11 व्यक्तींनी जीव गमावला आहे.