उस्मानाबाद - परंडा तालुक्यातील आसू गावाच्या एका ३८ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर उस्मानाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्याचा ५ जुलैला उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर त्या रुग्णाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात तो, मला कोरोनाची लागण झाली असून मी उपचार घेत आहे. पण येथील डॉक्टर व्यवस्थित उपचार करत नाहीत. रात्री ऑक्सिजन बंद करतात, असा आरोप करत ही बाब जिल्हाधिकारी साहेबांना सांगा, असे आवाहन करताना पाहायला मिळाला. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ माजली. आता या प्रकरणी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहेत.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे म्हणाल्या, 'त्या तरुण रुग्णाचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची शक्यता असून याबाबत मी स्वतः खात्री केली आहे. त्याचा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात आला नव्हता. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी रुग्णालयात डॉक्टर हजर असतात. त्यामुळे त्या तरुणाने व्हिडिओत जे सांगितले आहे. ते खोट आहे.'