उस्मानाबाद- कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळाना पोलीस दलाच्या वतीने, गावात एक गाव एक गणपती, तर शहरात एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना राबवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला जिल्ह्यातील मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यातही आवाहनाच्या पुढे जाऊन भूम येथे तालुक्यातील ५३ गावांचा मिळून एका गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या हस्ते श्री गणेशाची भूम पोलीस स्टेशन समोर प्रतिष्ठापना करण्यात आली. सार्वजनिक गणेशोत्सवात गर्दी होऊन कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता आहे. त्याची झळ अनेकांना बसू शकते, त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन समाजाच्या सुरक्षिततेसाठी भूम तालुक्यातील भूम शहरासह ५३ गावांचे गणेश मंडळ व गावकऱ्यांशी याविषयी चर्चा करण्यात आली. व त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सर्व मंडळे व गावकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे या निर्णयाला सहमीत दर्शवली होती. त्यानंतर, एकच सार्वजनिक गणपती भूम पोलीस ठाण्यासमोर बसविण्यात आला.