उस्मानाबाद - भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या भाजपाला सोडचिठ्ठी देऊन पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या शक्यतांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारणा केली असता, - खडसे हे विरोधीपक्षनेते होते, अर्थमंत्री होते. एका पक्षात उभारण्यात त्यांचे योगदान होते, याकडे लक्ष वेधत भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असल्याची टीका पवार यांनी केली. तसेच त्यांच्या त्यागाची सध्या नोंद घेतली जात नसल्याने ते सध्या पक्षांतराच्या विचारात असतील, असे मतही खडसेंच्या प्रवेशांबाबत पवारांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पवार दोन दौऱ्यावर आहेत. त्यावेळी उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भाजपचे नेते खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या मुहुर्ताच्या तारखाही अनेकवेळा समोर आल्या आहेत. तसेच त्यांनी भाजपच्या सद्यस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचेही चर्चा सुरू होती. मात्र रविवारी खडसे यांनी स्वत: राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांनीही खडसे पक्ष सोडणार नसल्याचे सांगितले.
उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे हे भाजपचे वजनदार नेते आहेत. मात्र, फडणवीस सरकारमध्ये त्यांना सातत्याने डावलले गेले. तिकीटही नाकरले. त्यामुळे पक्षावरचा विशेषत: फडणवीसांवरचा राग त्यांनी कित्येकवेळा बोलूनही दाखवला आहे. त्यानंतर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या शक्यता अद्यापही वर्तवल्या जात आहेत. त्याबाबत पवारांना आज उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत विचारणा केली असता, खडसेंसारख्या सक्षम नेत्याची त्यांच्या पक्षात दखल घेतली जात नसेल, तर ते त्यांच्या नेतृत्वाला जिथे किंमत मिळते अशा पक्षात प्रवेश करण्याचा विचार करत असतील, त्यांना निर्णय घ्यावा लागेल असे पवार म्हणाले.
पवार म्हणाले, एकनाथ खडसे हे मातब्बर नेते आहेत सक्षम विरोधक आहेत. माजी महसूल मंत्री आहेत. काही वेळा त्यांनी आम्हाला शिव्याही दिल्या आहेत. मात्र, सध्या भाजपमध्ये त्यांची दखल घेतली जात नाही. तसेच दुर्दैवाने त्यांच्या त्यागाची नोंद घेतली नाही. त्यामुळे जिथे नोंद घेतली जाते, तिथे जावं असे त्यांना वाटत असेल तर काय करावे, असे म्हणत पवार यांनी त्यांच्या प्रवेशाबाबत सुचक वक्तव्य केले आहे.
राणाजगजितसिंह पाटलांची घर वापसी नाही?