उस्मानाबाद - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्याचे पडसाद राज्यभर पहायला मिळत आहे. अशात याच मुद्द्यावर उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेचे आमदार-खासदार यांच्यात ट्विट वॉर सुरू झाले आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकमेकांविरोधात केलेल्या ट्विटची चांगलीच चर्चा सुरू आहे.
भाजप आमदार राणा पाटील यांचे ट्विट -
जगाला तालिबानपासून आणि महाराष्ट्राला धनुष्यबाण पासून खरा धोका आहे, असे ट्विट भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले आहे. आमदार पाटील यांनी राणे यांच्या अटकेचा निषेध ट्विट करून केला आहे त्या ट्विटला शिवसेनेने उत्तर दिले आहे. "धनुष्यबाण हे अर्जुनाचे अस्त्र आहे त्यापासुन फक्त कौरवांना धोका, राज्यात तर 105 कौरव आहेत त्याला फक्त धनुष्यबाणच रोखणार", असे ट्विट शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी करत आमदार पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. इतकंच नाही तर उस्मानाबाद जिल्हाप्रमुख तथा उस्मानाबाद मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील व उमरगा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी देखील असेच ट्विट केले आहे.
भाजपच्या आमदारांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कौरवांची उपमा दिली असून त्याला शिवसेनेचा धनुष्यबाणच रोखणार, असे सांगत हल्लाबोल केला आहे. हा वाद इतक्यातच थांबला नाही तर दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील एकमेकांवर सोशल मीडियावरून हल्लाबोल सुरू केला.