उस्मानाबाद -जिल्ह्यात सक्तीच्या टोल वसुलीच्या विरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेली पाहायला मिळाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरच्या फुलेवाडी या टोल नाक्यावर मनसेने खळखट्याक ( MNS Agitation at Phulewadi Toll Plaza in Tuljapur ) आंदोलन केले. येथील टोलनाक्यावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वाढत्या अरेरावी व दादागिरीबाबत विचारपूस करताना मनसे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे ( MNS Osmanabad District President Prashant Navgire ) यांची टोल कर्मचारी व अधिकारी यांच्याशी शाब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान प्रशांत नवगिरे यांनी टोलनाका मनसे स्टाइल आंदोलन करत फोडला. तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र नवगिरे यांनी रॉडने काचाची नासधूस केली.
प्रतिक्रिया देतांना मनसे पदाधिकारी मनसे जिल्हाध्यक्षांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल
या दरम्यान टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात नवगिरे यांच्या विरोधात तक्रार दिली असुन पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत नवगिरे यांना विचारले असता, फुलवाडी व तलमोड हे दोन्ही टोलनाके लुटमार केंद्र बनलेली असून या टोल महामार्गावरील सर्वच उड्डाणपुले, सव्हिस रोड, व्हिलेजरोड व इतर सर्वच कामे ही अर्धवट स्थितीत आहेत. कुठलेच काम पूर्ण करण्यात आले नाही. या महामार्गावर प्रचंड मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे वाहनांचे वारंवार अपघात होऊन हजारो निरपराध लोकांचे बळी गेले आहेत, असे नवगिरे म्हणाले. रस्त्यांची दुरुस्ती नाही. सर्वच कामे निकृष्ठ व अर्धवट आहेत. तर पैसा जातो कुणाच्या घशात? कोणाच्या चुकीमुळे जनतेला हा भुर्दंड भरावा लागत आहे. नियमानुसार हे टोल नाके सुरु होऊ शकतात का? याची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे असुन या टोलकंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. रस्ते व इतर सर्व कामे पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुल करु नये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद, जिल्हा पोलीस अधिक्षक उस्मानाबाद, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर यांना मागील दीड वर्षांपासून निवेदनाद्वारे सर्व गैरप्रकार सांगितलेले असताना देखील कोणतीच कारवाई आत्तापर्यंत करण्यात आली नाही, असे देखील नवगिरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -Omicron Variant : कर्नाटक - महाराष्ट्र सीमेवर तपासणी नागरिकांची सुरू