उस्मानाबाद - जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे नियोजित बालविवाह रोखण्यात बालविवाह प्रतिबंधला यश आले आहे. सदरील मुलीचे वय 17 वर्ष 3 महिने असून ती लातूर येथे शिक्षण घेत होती. मात्र, जिल्हा बालविवाह प्रतिबंध समिती सदस्य सचिन बिद्री यांनी सतर्कता दाखवल्याने हा बालविवाह टळला.
प्रतिबंध समितीच्या सतर्कतेमुळे नियोजीत बालविवाह रोखण्यात यश - बालविवाह प्रतिबंध कायदा
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील नियोजित बालविवाह रोखण्यात बालविवाह प्रतिबंधला यश आले.
सचिन बिद्री यांना बालविवाहाबाबत माहिती मिळाली होती. प्राप्त माहिती जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी, अशोक सावंत, उमरगा पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम आदींना त्यांनी कळवली. जिल्हा प्रशासनाकडून तातडीने सदर बालविवाह रोखण्याकरिता तत्काळ कारवाईचे पत्र पोलीस अधीक्षक कार्यालय, उमरगा तहसील कार्यालय आणि संबंधित सर्व कार्यालयाला पाठविण्यात आले. नारंगावाडी येथील संबंधित बालिकेच्या पालकांची भेट घेऊन त्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून कायद्याबाबत माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून पंचासमक्ष 18 वर्षानंतर विवाह करण्याबाबत लिखित स्वरूपात हमीपत्र घेण्यात आले.
या मुलीचे वय 17 वर्ष 3 महिने होते. ती लातूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असून, तिचा विवाह कर्नाटक राज्यातील आळंद तालुक्यातील मुलासोबत ठरला होता. मात्र, प्रतिबंध समितीच्या सतर्कतेमुळे नियोजित बालविवाह टळला.