उस्मानाबादMaratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी घोषणा देत उमरगा तालुक्यातील माडज येथील युवकाने गावातील तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. घटनेनंतर नायब तहसीलदार, पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देत प्रकरणाची माहिती घेतली.
मराठा आरक्षण मिळावं : जालना येथील मराठा समाजावरील गुन्हे रद्द करण्यात यावे. लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, आशा मागण्या करत माडज ग्रामस्थांनी शवविच्छेदन करण्यास विरोध दर्शविला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात मराठा समाजात मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
तलावात आत्महत्या :उमरगा तालुक्यातील माडज येथील किसन चंद्रकांत माने (वय ३२ वर्ष) या युवकानं आज सायंकाळी माडज येथील तलावात आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसायचं नाही, जालना येथील पोलिस लाठीमाराचा निषेध असो, मराठा आरक्षणासाठी मी आत्महत्या करीत असल्याच्या घोषणा देत त्यांनं तलावात उडी घेतली, असा दावा ग्रामस्थांनी केलाय. या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार राजाराम केलूरकर, पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
सरकार विरोधात घोषणाबाजी :तरुणाचा मृतदेह पाण्यातून काढण्यात आला आहे. परंतु जालना येथे झालेल्या भ्याड हल्ल्यातील दोषीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, मराठा समाजावर दाखल केलेले खोटे गुन्हे रद्द करण्यात यावेत. तसंच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, त्यानंतरच मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात यावं, अशी मागणी गावकऱ्यांनी केलीय. दरम्यान मराठा समाजाच्या काही युवकांनी रस्त्यावर टायर पेटवत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मात्र, या आत्महत्येबाबत प्रशासन ठामपणे काही सांगू शकत नसल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडं हा तरुण अविवाहित होता, त्याचं लग्न होत नव्हतं त्यामुळं तो निराश झाला होता. म्हणुन त्यानं आज मद्यधुंद अवस्थेत तलावात आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
हा तरुण शेतकरी कुटुंबातील असून यापूर्वी कोणत्याही मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झाला नव्हता. तसंच मराठा आरक्षणाबाबत सरकारला दिलेल्या कोणत्याही निवेदनावर माने यांची स्वाक्षरी किंवा नाव दिसलं नाही.- अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 9वा दिवस :मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे. त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकावर पोलिसांनी बळाचा वापर करून अमानुष हल्ला केला. त्याचा राज्यभर निषेध करण्यात आला. उमरगा शहरासह तालुक्यातील अनेक गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. माडज गावही बंद ठेवण्यात आलं होतं.
हेही वाचा -
- Eknath Shinde 2 GR announcement : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची घोषणा, म्हणाले...
- Manoj Jarange Press Conference: पोलिसांच्या लाठीचार्ज प्रकरणात मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप, म्हणाले...
- Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांची प्रकृती ढासळली