उस्मानाबाद- मराठवाडा आणि विशेष करून उस्मानाबाद जिल्हा म्हटले की, पाणीटंचाई, टँकर, दुष्काळ, नापिकी आणि दुबार पेरणी हेच नेहमी ऐकायला मिळते. यांचीच नेहमी-नेहमी येणाऱ्या आपत्ती म्हणून ओळख आहे. मात्र, उमरगा आणि लोहारा तालुक्यात कधी नव्हे तो खूप पाऊस पडला. दोन दिवसाच्या परतीच्या पावसाने शेतातील हातातोंडाशी आलेली पिके आणि त्याचबरोबर शेतातील मातीही वाहून गेली आहे.
सोयाबीनच्या गंजी, ऊस तसेच इतर पिके अगदी खरडून जमीनदोस्त झाली. सोयाबीनची गंजी वाहून जातानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. सोयाबीनची गंजी लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील दिलीप देशमुख यांचीही वाहून गेली आहे. देशमुख यांची दहा एकर सोयाबीनची शेती होती, त्यांनी लाखो रुपये खर्च करून सोयाबीन फडतून काढले होते. याची रास करण्यासाठी म्हणून याची बलिम रचून ठेवली. मात्र, या दोन दिवसांच्या पावसामुळे सोयाबीनची गंजी पूर्णपणे पाण्यात वाहून गेली. त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.