उस्मानाबाद - शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा ही फक्त सुरुवात आहे. यापुढे अनेक आमदार आणि मंत्री राजीनामा देतील. महाविकास आघाडीचे सरकार दोन महिन्यात कोसळणार असल्याचे भाकीत नारायण राणे यांनी केले. राणे सहकुटुंब तुळजापूर येथे दर्शनासाठी आले होते, तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नारायण राणे सहकुटुंब तुळजापूर येथे आले होते
त्यांनी विद्यमान सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार येवून सव्वा महिना झाला, तरी अद्याप खाते वाटप झाले नाही. बंगले, दालने घेतली मात्र कारभार सुरु केला नाही. विद्यमान मुखमंत्र्यांना प्रशासन चालवण्याचा काहीही अनुभव नाही. राज्यकारभार चालवण्याचा अभ्यास नसल्याने त्यांचा प्रशासनावर वचक नाही.
हेही वाचा - आता लढाई आंबेडकर विरुद्ध गोळवलकर'
हिंदुत्ववादी शिवसेना आणि धर्म निरपेक्षवादी काँग्रेस असे वेगवेगळ्या विचाराचे पक्ष महाराष्ट्राच्या हितासाठी नाही तर स्वत:च्या हितासाठी एकत्र आले आहेत. कर्जमाफीच्या अध्यादेशामध्ये कर्जमाफीची तारीख नाही. अर्थिक तरतूद नाही. त्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा आरोप राणे यांनी केला.
हे सरकार महाविकास आघाडीचे नसून फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. शिवसेना आणि काँग्रेस हे नामधारी आहे. ठाकरेंनी स्वत:च्या घरात दोन मंत्रिपदे घेतली. मागील पन्नास वर्ष निष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकांना डावलून त्यांच्यावर अन्याय केला असल्याची टीका राणे यांनी केली.