उस्मानाबाद -कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा व महाविद्यालये सुरू करण्याच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेना रस्त्यावर उतरणार आहे. शाळा सुरू करा अन्यथा चालू शैक्षणिक वर्ष रद्द करा, अशी मागणी घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह महाराष्ट्रातील शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद आहेत. १ सप्टेंबरपासून एसटी, उद्योग, बाजार, आडत बाजार, मॉल आदी सुरू झाले आहेत. काही व्यक्ती धार्मिक स्थळे व प्रार्थना स्थळे उघडण्यासाठीही आंदोलन करत आहेत. परंतु, शाळा व महाविद्यालये उघडावीत यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नाही. ऑनलाइन शिक्षणाचाही गोंधळ उडाला असल्यामुळे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.