उस्मानाबाद- शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळेवाडीत १९९५ पासून टँकर सुरू आहेत. येथील वृद्धांपासून ते शाळकरी मुले १२ महिने टँकरच्या पाण्यासाठी रांगा लावत आहेत. गावातील रोज १२ हांडे पाणी मिळण्यासाठी महिन्याला १०० रुपये मोजत आहेत. त्यामुळे या गावचा पाणी प्रश्न कधी सुटेल, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
कोळेवाडी ग्रामस्थांची प्रतिक्रिया
गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया
१. गावातील प्रथमेश अकोसकर म्हणाला, त्याच्या लहानपणापासून तो टँकरचेच पाणी आणतो. गावात नळाला पाणी आलेले कधीच पाहिले नाही. पाण्यासाठी दररोज येथे रांगा लागतात आणि हेच पाणी पिण्यासाठी वापरतो.
२. ७० वर्षांच्या आज्जी इंदूबाई अकोस्कर म्हणाल्या, पतीला आणि त्यांना दोघांना खांद्यावर पाणी आणावे लागते. येथे जवळपास कोठेच पाणी नाही. टँकरनेच पाणी आणावे लागते. आमच्या घराजवळच पुरातन कोरीव बांधकाम केलेली विहिर आहे. परंतु, ती कोरडीठाक पडली आहे. टँकरच्या पाण्यासाठी महिन्याकाठी १०० रुपये मोजावे लागतात. त्यानंतर एका दिवसाआड १२ घागरी पाणी मिळते.
३. विकास इंगळे म्हणतात, टँकर आल्यावर सगळी कामे बाजूला ठेवावे लागतात. या पाण्यासाठी आम्ही महिन्याला १०० रुपये देतो. तरीही येथे भांडणे होतात.
४.१५ वर्ष सरपंच पद भूषविलेले राऊत म्हणाले, आमच्या गावचा राष्ट्रीय पेय जल योजनेत समावेश करण्यात आला होता. मात्र, आमच्या गावात जीवन प्राधिकरण योजना राबविण्यात आल्यामुळे पेय जल योजना रद्द करण्यात आली. आणि जीवन प्राधिकरणची योजना १३ लाख रूपये लाईट बिल आल्यानंतर बंद पडली.