उस्मानाबाद : नुकत्याच झालेल्या अंडर 19 क्रिकेट विश्वकप ( Under-19 Cricket World Cup ) विजेता संघाचा भाग असलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू राजवर्धन हंगरगेकर ( All-rounder Cricketer Rajvardhan Hangargekar ) हा अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर वय लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तशी तक्रार भारतीय नियामक क्रिकेट मंडळाकडे ( Board Of Cricket Control India ) करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी बीसीसीआयकडे लेखी तक्रार केली आहे.
विभागीय चौकशीची शक्यता
ओमप्रकाश बकोरिया यांनी आपल्या तक्रारीत काही पुरावे देखील सादर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजवर्धन याची विभागीय चौकशी होऊ शकते. राजवर्धन उस्मानाबादच्या तेरणा पब्लिक स्कुलमध्ये शिकलेला आहे. पहिली ते सातवीपर्यंत त्याची शाळेत 10 जानेवारी 2001 अशी जन्मतारीख होती. तर आठवीत 10 नोव्हेंबर 2002 अशी करण्यात आली, असं आपल्या तक्रारीत ओमप्रकाश यांनी नमूद केलं आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ राहुल गुप्ता यांनी देखील याबाबतची पृष्टी केल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे नुकतंच झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप दरम्यान राजवर्धनचं वय 21 होतं, जे नियमबाह्य आहे, असं सुद्धा तक्रारीत सांगण्यात आलं आहे.
अंडर19 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करत आला प्रकाशझोतात
वेस्ट इंडिज येथे झालेल्या अंडर19 वर्ल्ड कप स्पर्धेत राजवर्धनने भारतीय संघात जागा मिळवली होती. या दरम्यान त्याने 5 सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या. तर एका सामन्यात फलंदाजीत करत असताना एका षटकात 3 षटकार ठोकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. राजवर्धन हा एकटा भेदक गोलंदाजीमुळे फलंदाजांना अडचणीत टाकत होता. 140 च्या गतीने तो गोलंदाजी करत असल्याने त्याच्याकडे अपेक्षेने पाहिले जात होते.