तुळजापूर (उस्मानाबाद) - शिवसेनेच्या आमदार-खासदारांना बेकायदेशीररित्या तुळजा भवानी मंदिराच्या ( Tulja Bavani Mandir ) गाभाऱ्यात प्रवेश देऊन दर्शन दिल्याप्रकरणी तुळजाभवानी देवस्थानातील पूजाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. देवस्थानातील 4 पुजाऱ्यांवर नियमांचा भंग केल्याप्रकरणी 6 महिने मंदिर प्रवेशबंदीची कारवाई ( 6 months ban on tuljabavani mandir pujari ) करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनांनी ही कारवाई केली आहे. शिवसेना शहरप्रमुख तथा मंदिर पुजारी सुधीर कदम यांचा यात समावेश आहे.
काय आहे प्रकरण ?
उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि उस्मानाबाद-कळंब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह दि. 21 फेब्रुवारी रोजी दुपारी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले होते. या दरम्यान पुजारी सुधीर कदम आणि इतर पुजाऱ्यांनी सुरक्षा रक्षकाला दमदाटी करत त्यांच्याकडून गाभाऱ्याची चावी घेत खासदार आणि आमदारांना गाभाऱ्यात नेले आणि पूजा-आरती केली. जे मंदिर संस्थानाच्या नियमाच्या विरोधात आहे. पुजाऱ्यांनी सुरक्षा रक्षकाला दमदाटी करत चावी घेऊन गाभाऱ्यात प्रवेश दिल्याचं मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी सुरक्षा निरीक्षक सचिन पवार यांच्याकडून सर्व बाबींचा अहवाल प्रशासनाने प्राप्त केला. तसेच नमूद वेळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. ज्यात अहवालात सांगितल्याप्रमाणे प्रकार घडला आहे. त्यामुळे तुळजापूरचे तहसीलदार तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासन व्यवस्थापक यांनी अंतरिम आदेश काढत पुजाऱ्यांवर बंदीची कारवाई केली आहे. तसेच हा कालावधी 12 महिने का करण्यात येऊ नये याबाबतचा खुलासा मागविण्यात आला आहे.