उस्मानाबाद- मी शरद पवारांसारखा फक्त बोंबलत फिरत नाही, तर काम करून दाखवतो, असे म्हणत आज उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि काँग्रेसवरती सडकून टीका केली. विमा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचा प्रश्न असो, आम्ही तो सोडवतो आणि फक्त यासाठीच सत्तेत राहतो. तुम्ही आम्हाला नाव ठेवले तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही सत्तेत राहिलो असल्याचे सांगत ठाकरे यांनी शरद पवार व काँग्रेस वरती जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे आज महायुतीचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी उस्मानाबाद येथे आले होते. यावेळी त्यांनी पवारांसह काँग्रेसवरती सडकून टीका केली. त्याचबरोबर शिवसेनेच्या जाहीरनाम्याचा उल्लेख करत आम्ही आमच्या वचन नाम्यात एक रुपयात आरोग्य तपासणी करणार आहोत, यावर शरद पवार यांनी टीका केली होती. याला प्रत्युत्तर देत तुम्ही या. तुमच्या डोक्यापासून ते पायापर्यंत तुमची तपासणी करू, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना लगावला. यावेळी महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले, कैलास पाटील त्याचबरोबर विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर उपस्थित होते.