उस्मानाबाद - कोरोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्या जिल्ह्यातील तिन्ही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना काल (सोमवार) उशिरा डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता उस्मानाबाद जिल्हा हा कोरोनामुक्त जिल्ह्यांच्या यादीत आला आहे.
कोरोनावर मात करणाऱ्या 'त्या' तिनही रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत - कोरोनाशी लढा
जिल्ह्यातील तीनही कोरोना रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान कोरोनासारख्या आजारावर मात करणाऱ्या या तिन्ही रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
जिल्ह्यातील लोहारा आणि उमरगा या दोन तालुक्यांमध्ये तीन कोरोना रुग्ण आढळून आल्याने चिंतेचे वातावरण पसरले होते. मुंबई, पानिपत आणि दिल्ली येथून आलेल्या या रुग्णांवर उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या 14 दिवसांपासून क्वारंटाईन करुन उपचार सुरू करण्यात आले होते. त्यांचा आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची चाचणी घेण्यात आली. यात त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान या तिन्ही रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, सुरेश बिराजदार, किरण गायकवाड, डॉ. एकनाथ माले वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडीत पुरी यांच्यासह परिश्रम घेणारे इतर डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक, रुग्णालय स्टाफ त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होता. तर, या तिघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने उस्मानाबाद जिल्हा तूर्तास कोरोनामुक्त झाला आहे.