उस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पाला पूर आला असून अनेक गावांचे संपर्क तुटले आहे. तर काही भागात नागरिक अडकून पडले होते. त्यांना काढण्यासाठी एनडीआरएफच्या टीम जिल्ह्यातील अनेक भागात दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमने शेकडो नागरिकांना संकटातून बाहेर काढण्याचे काम केले. दिवसभर हेलिकॉप्टरच्या साह्याने पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे बचावकार्य सुरू होते.
जिल्ह्यातील धरणांची सर्व दरवाजे उघडले -
जिल्ह्यात सततच्या पडत असलेल्या पावसामुळे मांजरा धरणाचे सर्व 18 दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे कळंब तालुक्यातील वाकडी, सौंदना, आंबा तसेच उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपुर येथे मिळून जिल्ह्यात एकूण 31 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. एनडीआरएफ टीम दाखल होऊन त्यांनी रेस्क्यु ऑपरेशनकरून त्यांना बाहेर काढले. जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, निम्न तेरणा, सीना-कोळेगाव ही मोठी धरणे भरले असून पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
जनावरे गेली वाहुन -
जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनावरे देखील वाहून गेले. वाकडी (शिराढोण) येथील प्रसाद सोमासे, उध्दव शिंदे, रामराव शिंदे हे शेतात घर करुन राहतात. रात्री तीनच्या सुमारास त्यांना घराला पाण्याचा वेढा घातल्याचे लक्षात आले. त्यामुळे भितीपोटी त्यांना घराच्या स्लॅबवर जाऊन बसावे लागले. तर जनावरांनाही स्लॅबवर नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र त्यांचा प्रयत्न अयशस्वी राहिला. त्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने जनावरे वाहून गेली.