उस्मानाबाद - 'स्वच्छ भारत मिशन' या अभियानांतर्गत उस्मानाबाद पंचायत समितीच्यावतीने तेर येथे पहाटे भेट देण्यात आली. गावातील विविध ठिकाणी उघड्यावर शौचाला जाणाऱ्या 53 लोटाबहाद्दरांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने अभिनंदन करण्यात आले. उघड्यावर शौचाला गेल्यास दंडात्मक कारवाई कशी होते, याची समज देण्यात आली.
शौचालये असूनही वापर नाही -
'स्वच्छ भारत मिशन' अभियानांतर्गत तेरमध्ये 100 टक्के शौचालयांचे बांधकाम झाले आहे. मात्र, बहुतांश नागरिक शौचालयाचा वापर न करता बाहेर जात असल्याचे निदर्शनास आले होते. यापूर्वी तेर ग्रामपंचायतीला 'हगणदारीमुक्त गाव' पुरस्कारही मिळालेला आहे. मध्यंतरीच्या काळात गुडमॉर्निंग पथकाची कारवाई थांबली होती, त्यामुळेच काही नागरिक बाहेर शौचाला जात होते. पहाटेच्या सुमारास पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांच्या नेतृत्वाखाली शरद भांगे, शोभा टेकाळे,यांच्या पथकाने तेर येथील पेठ विभाग, निळा झेंडा चौक, गोरोबाकाका मंदिर परिसर, जागजी रस्ता या ठिकाणी कार्यवाही करीत 53 जणांना पकडले आहे.
या मोहिमेत ग्रामीण स्तरावरील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. प्रशांत नाईकवाडी, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण समुह समन्वयक भागवत शिंदे, ग्रामसेवक राहुल गायकवाड, बीट अंमलदार एस. एस.गिरी, ग्रामपंचायत कर्मचारी वैभव डिग्गे, अविनाश खांडेकर, अशपाक शेख, बाळासाहेब रसाळ, छोटूमिया कोरबू, आशा स्वंयसेविका,अंगणवाडी सेविका मदतनीस आदींनी या गांधीगिरीच्या कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, पुढील काही दिवसात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे. यापुढे बाहेर शौचाला जाणाऱ्या नागरिकांना 1हजार 200 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे.