उस्मानाबाद -जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांना शासनाकडून कायम स्वरुपाचे मानधन मिळून देण्याचे अमिष दाखवत, एका व्यक्तीने 4 लाखांचा गंडा घातला आहे. स्वतःला 'महाराष्ट्र राज्यग्राम रोजगार सेवक संघ, औरंगाबाद' येथील संस्थेचा अध्यक्ष असल्याचे सांगत विनोद चव्हाण नावाच्या व्यक्तीने ही फसवूक केल्याचा आरोप सेवकांनी केला आहे. परांडा तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांसोबत हा प्रकार घडला आहे.
हेही वाचा... सांभर तलावाभोवती आढळले हजारो पक्षांचे मृतदेह..
रोजगार हमी योजनेचे काम पाहणारे ग्राम रोजगार सेवकांना शासनाकडून कायम स्वरुपी दर महिना मानधन मिळवून देण्यासाठी मंत्रालयातून जीआर काढून देतो, असे या व्यक्तीने खोटे सांगितले. स्वतःला संघटनेचा तथाकथीत अध्यक्ष म्हणावणाऱ्या विनोद चव्हाण याने परंडा तालुक्यातील रोजगार सेवकांची विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रालयातून जीआर निघेल, असे खोटे सांगून पैसे लाटले. सुमारे ४० ग्राम रोजगार सेवकांकडून प्रत्येकी १० हजाराप्रमाणे ४ लाख रुपये त्याने घेतल्याचे सेवकांनी म्हटले आहे.