उस्मानाबाद - जिल्ह्यात अजूनही चांगला पाऊस झालेला नसल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस पडावा म्हणून ग्रामीण भागात आजही वेगवेगळ्या रूढी-परंपरा पाळल्या जातात. जिल्ह्यातही लहान मुले-मुली पाऊस पडण्यासाठी प्रार्थना करतात. बालकांमुळे ही परंपरा एक वेगळे आकर्षण ठरत आहे. हे चिमुकले पाऊस पडावा म्हणून 'चंकोबा' खेळ खेळतात. 'पाऊस-पाणी पडू दे.. राळा, भादली पिकू दे...पैशाला पेंडी विकू दे...' ही कविता म्हणत संपूर्ण गावभर फिरून पाऊस पडण्यासाठी प्रार्थना करतात.
चंकोबा खेळणे म्हणजे काय...?
चंकोबा खेळण्यासाठी गावातील चिमुकले एकत्र येतात. छोटासा चिखलाचा गोळा करून त्याला शंखाकृती आकार दिला जातो. त्या चिखलाच्या शंखाकृतीच्या वरती हराळी या गवताची काडी लावली जाते. त्यानंतर याला 'चंकोबा' असे नाव देऊन एका वाटीत ठेवतात. त्यानंतर ही लहान मुले चंकोबाची वाटी घेऊन संपूर्ण गावभर फिरत घरोघरी जातात. या लहान मुलांचे प्रत्येक घरोघरी आनंदाने स्वागत केले जाते. मुलींना कुमारिका म्हणून हळदी-कुंकू लावले जाते. त्याचबरोबर सोबत असलेल्या चंकोबाला देखील हळदी कुंकू लावले जाते.
त्यानंतर सर्व मुले एक सुरामध्ये 'पाऊस पाणी पडू दे.. राळा, भादली पिकू दे.. पैशाला पेंडी विकू दे..' हे छोटसे गाणे म्हणतात. नंतर चंकोबाची वाटी उलटी केली जाते. या वाटीतील चंकोबा सरळ पडला तर पाऊस नक्की येईल, शेतकरी आनंदी होईल, शेत-अन्न चांगले पिकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र, जर चंकोबा आडवा किंवा उलटा पडला तर शेतकऱ्यांसाठी अपशकून मानला जातो. यानंतर चंकोबा खेळणाऱ्या लहान मुलांना घरातील गहू, तांदूळ, ज्वारी असे धान्य देऊन पाऊस पडण्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात. हे धान्य गोळा केल्यानंतर सर्व धान्य विकतात. यातून आलेल्या पैशातून पूजेचे साहित्य घेऊन ग्रामदेवतेची पूजा केली जाते. त्यानंतर नारळ फोडून नारळाचा प्रसाद गावातील लोकांना वाटला जातो. अशा पद्धतीने चंकोबा खेळ खेळला जातो.