मुंबई - मागील एक वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू असून आता दुसरी लाट आली आहे. ही चिंतेची बाब असताना याच काळात उस्मानाबादमधील कळंबमध्ये सर्दी-ताप-अंगदुखीवरील बनावट औषधांची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. ही औषधे बनावट आणि अप्रमाणित असल्याचा औरंगाबाद प्रयोगशाळेच्या अहवाल प्राप्त झाला. त्या पार्श्वभूमीवर जनआरोग्य हित लक्षात घेत 9 मार्चला कळंबमधील एका रुग्णालयासह ही औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांकडून 1 लाख 78 हजार 950 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
धक्कादायक! ऐन कोरोनाच्या काळात कळंबमध्ये बनावट औषधांची विक्री - अन्न आणि औषध प्रशासन कारवाई
उस्मानाबादमधील कळंबमध्ये सर्दी-ताप-अंगदुखीवरील बनावट औषधांची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याबाबत एफडीएला माहिती मिळाली होती. त्यानुसार एफडीएने जून 2020 मध्ये याविरोधात कारवाई करत कळंब येथील डॉक्टरांच्या कंपनीतून सर्दी-ताप-अंगदुखीवरील औषधांचे (टॅबलेट) नमुने ताब्यात घेतले. तपासणी अहवालानुसार ही औषधे बनावट आणि अप्रमाणित असल्याची धक्कादायक बाब उघड झाली.
या कारवाईबाबत व्ही व्ही दुसाने, औषध निरीक्षक, उस्मानाबाद, अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) यांनी 'ईटीव्ही भारत'ला माहिती दिली आहे. तर आता कोलकत्ता येथील प्रयोगशाळेचा अहवाल येणे बाकी आहे. हा अहवाल आल्यानंतर औषध विक्रेत्यांपासून उत्पादकापर्यंत सर्वांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जुनमध्ये कारवाईला सुरुवात-
2017 मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील 9 डॉक्टरांनी एकत्र येत डीकेडी फार्मा एलएलपी ही कंपनी सुरू केली. ही कंपनी हिमाचल प्रदेश मधील व्हिजन हेल्थ केअर या फार्मा कंपनीकडून औषध घेऊन ती आपल्या कंपनीच्या नावे त्याचे मार्केटिंग करून आपल्याच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना विकत होती. याबाबत एफडीएला माहिती मिळाली होती. त्यानुसार एफडीएने जून 2020 मध्ये याविरोधात कारवाई करत कळंब येथील डॉक्टरांच्या कंपनीतून सर्दी-ताप-अंगदुखीवरील औषधांचे (टॅबलेट) नमुने ताब्यात घेतले. हे नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. सप्टेंबरमध्ये यासंबंधीचा अहवाल आला. या अहवालानुसार ही औषधे बनावट आणि अप्रमाणित असल्याची धक्कादायक बाब उघड झाली. लेबलवरील औषध घटक द्रव्य आणि प्रत्यक्षातील औषध घटक द्रव्यात तफावत होती. त्यानुसार पुढे एफडीएने पुढील कारवाई सुरू केली असून ती अजूनही सुरूच आहे.
उत्पादक कंपनीने घेतला आक्षेप
सप्टेंबरमध्ये अहवाल आल्यानंतर एफडीएने या औषधांची विक्री आणि उत्पादन थांबविण्याचे आदेश उत्पादन कंपनीसह संबंधितांना दिले. पण हिमाचल मधील कंपनीने यावर आक्षेप घेतला. अहवाल अमान्य करत याला आव्हान दिले. यात बराच वेळ गेला आणि आता मागील आठवड्यात 6 मार्चला कळंब न्यायालयात अर्ज करत नमुने पुन्हा तपासणीसाठी केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कोलकाता येथे तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे दुसाने यांनी सांगितले. आता या अहवालाकडे एफडीए आणि कळंबकरांचे लक्ष लागले आहे. मात्र हा अहवाल येण्याआधीच चार दिवसांपूर्वी, 9 मार्चला एफडीएने जनआरोग्य हित लक्षात घेत संबंधितांकडून 1 लाख 78 हजार 950 रूपयांचा औषध साठा जप्त केला.
सर्दी-ताप-अंगदुखी ही कोरोनाची लक्षणे असून सर्वसाधारणपणे रुग्णांना यावरील औषधे दिली जातात. अशावेळी कळंबमध्ये जर सर्दी-तापावरील ही बनावट औषधे रुग्णांना दिली जाऊ नये, असे म्हणत एफडीएने जप्तीची कारवाई केली आहे. तर आता मार्केटिंग कंपनी सुरू करणाऱ्याची चौकशी सुरू केली आहे. तेव्हा या चौकशीतून आणि कोलकाता प्रयोगशाळेतील अहवालातून काय बाब उघड होते हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान यातून बनावट औषधांचे उत्पादन आणि विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत असून ते नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची शक्यता यानिमित्ताने व्यक्त होत आहे. तर यादृष्टीने ही तपास करण्याची मागणी होत आहे.